मेधा थत्ते

Photo source – she the woman, The woman’s channel 

“कशी ही महामारी आली. झोप उडाली. भूक मेली, उदासी दाटली! भीती इतकी की घाबरून मरतो असे वाटले. या महामारीने आमच्या पाठीवर तर मारलेच मारले! पोटावरही मारले. कष्ट करणारे हात थंड पडले. गती गेली माणसांची. रोगाचा कहर माजला. कच्ची-बच्ची पंखाखाली घेऊन दिवस काढायची वेळ आली होती. काढले ते दिवस. पण वनवास कधी संपेल ते कळत नाही.’’ अशा उद्गारांनी घरेलू कामगार बोलतात.

घरेलू कामगार अतिशय हतबल आहेत. जी बाई करोनापूर्वी सात-आठ घरी जाऊन घरकाम करायची, ती सध्या एक किंवा दोन कामे करत आहे. ती सांगते “मालकिणीकडे मे महिन्यानंतर दर पंधरा दिवसांनी गेले. कधी फोन केले. पण नकार मिळत राहतो.’’ नवे कामही मिळत नाही. तगमग होते. करणार काय?’’

बहुसंख्य घरेलू कामगारांचे काम गेले आहे. काम परत मिळेल अशी त्यांना आशा आहे. पण खात्री नाही. घर प्रपंच कसा चालवायचा ही काळजी त्यांच्या मनाला खात राहते. या काळजीने रोग लागायचा ही धास्ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. ज्या वस्त्यांमध्ये घरेलू कामगार राहतात त्या सर्व वस्त्या कष्टकऱ्यांच्या आहेत. हॉटेल कामगार, बांधकाम मजूर, प्लंबर, रंगकाम करणारे पेंटर, रिक्षावाले, भाजी विकणारे, दुकानात काम करणारे, वॉचमन अशी कामे करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या वस्त्या आहेत. ते सर्वजण मार्च २२ च्या लॉकडाऊननंतर घरात बसलेली आहेत. काम केले तर कमाई होईल. त्यावर घर प्रपंच चालेल. ते सगळेच ठप्प झाले. बचत बाहेर काढा आणि ती संपवून जीवन जगवा अशी वेळ आली आहे. पण बचत छोटी होती ती वर्षभर पुरेल हे शक्य नाही.

वंदना सांगते, “तिची दोन्ही मुलं पाच वर्षांपेक्षा लहान आहेत. नवरा हॉटेल कामगार आहे. ती चार घरी घरकामाला जात होती. झोपडपट्टीत ती भाड्याच्या खोलीत राहते. एप्रिलपासून ती आणि तिचा नवरा घरात बसून आहेत. गेले सहा-सात महिने घरातच आहेत.’’ ती म्हणते, “मला खूप खजील व्हावे लागते. घरमालक ‘भाडे द्या’ असा तगादा लावतो. काय सांगू. ‘थांबा दादा देऊ देऊ!’ सांगतो, ‘कामाला गेलो की पहिलं तुमचं देऊ’ सांगतो. किराणामाल दुकानदार विचारतो, ‘किती दिवस उधारी?’ ‘देऊ देऊ’ सांगतो. ‘कामाला गेलो की फेडू उधारी’ म्हणतो. काय सांगणार? विज बिल थकलयं त्याचं टेन्शन येतं. भाज्या कधीतरी आणतो. भागवतो आहोत कसंतरी’’ वंदना सांगते, ‘‘बचत संपली. उसनंपासनं काही थोडं मिळालं. त्यावर जगलो. पण थकलेलं घरभाडं, किराणा बिल, विज बिल, टोचत राहतं. झोप लागत नाही.’’ तिच्या बोलण्यात अजिजी आहे. काम मिळेल का याची ती सतत चाचपणी करते.

राहायला भाड्याचे घर असणाऱ्या घरेलू कामगार स्त्रियांची संख्या अंदाजे 20 टक्के होईल. 50 लाख लोकसंख्या असलेल्या पुणे परिसरात 80 हजार घरेलू कामगार असावेत ह्या अंदाजाने 16,000 घरेलू कामगार भाड्याच्या घरात राहतात. त्या सर्वांची स्थिती कमी-अधिक प्रमाणात बिकट आहे. उधारी, उसनवारी याने त्यांचा जीव मेटाकुटीस आलाय.

सुवर्णा सांगते, “गणपती नंतर नवरा कामाला जायला लागला. ती स्वतः करोनापूर्वी पाच घरी कामाला जायची. आता फक्त एका घरी जाते. नवऱ्याचा पगार त्याच्या मालकाने निम्मा केला. आता त्याला 5,000 रुपये महिना काम करावे लागते. तक्रार करायची काही सोय नाही. तिची कामे परत मिळायची वाट बघत आहे.’’ केवळ वाट पाहत राहणे हेच सुवर्णाच्या हातात राहिले आहे.’’

लताबाई म्हणाली, “आमच्या घरी दुष्काळात तेरावा महिना आला. त्या 50 वर्षाच्या आहेत. मुलगा एका कंपनीत काम करतो. नवरा वॉचमन आहे. एप्रिलनंतर दसऱ्यापर्यंत दोघेही घरात बसलेले आहेत. त्यांना पेशंट सांभाळायचे काम मिळाले होते. ते चालू राहिले. पण या सहा महिन्यात घरात आजारपणाने बेजार केले. नवरा घरात जिन्यावरून पडला. त्याच्या पायाला, कमरेला फ्रॅक्चर झाले. एप्रिलमध्ये त्यांना दवाखान्यात न्यायला ॲम्बुलन्सही मिळाली नाही. रिक्षाही मिळेना. तेव्हा कडक लॉकडाऊन होता. कशीबशी रिक्षा मिळाली. एका खाजगी हॉस्पिटलात नेले. तिथे अवाच्या सव्वा बिल आले.’’

लताबाई सांगतात, “त्याच वेळी मुलगाही आजारी पडला. त्याचे पोट दुखायचे. निदान करायला दोन-तीन डॉक्टरांकडे गेलो. माझ्या मुलाचा धीर सुटत चालला. मी, माझी सून त्याला जपायचो. आम्ही या दोघांचे औषधपाणी केले. घरातलं सगळं सोन विकून टाकलं. सुनेचं गंठण गेलं. माझ्या कानातल्या कुड्या गेल्या. गळ्यातली सोन्याच्या मण्यांची पोत गेली. काय करणार माणसं वाचवलीत हे मोठं काम केलं. करोनात या पुरुष माणसांची कमाई झिरो झाली. त्यात आजारपण मोठं. जगून निघालो जिंकलो.’’

घरातील कोणालातरी आजाराने पीडलं असं सांगणाऱ्या अनेक घरेलू कामगारांच्या डोळ्यात पाणी भरून येते. रिक्षा, बस नाही, बाहेर जाता येत नाही. मोठा आजार, मोठा खर्च. 5 टक्के किंवा 10 टक्के व्याजाने कर्ज काढावं असं सांगणाऱ्या अनेक जणी भेटल्यात. काही जणींनी असे 50 हजार रुपये तर काहींनी एक लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे. हे फेडायला कामं मिळाली तर पुढची काही वर्षे खर्ची पडतील असं त्या सांगतात.

काही जणी खाजगी किंवा इंग्लिश मीडियम शाळेत मुलांना शिकवतात. या शाळांना फी माफ नाही. शाळेत जायचे नाही, ऑनलाईन शाळा झाली. पण फी भरावी लागली. त्याचा तगादा चालू आहे. ‘अपमान वाटतो पण मजबुरी आहे!’ असे अनेक जणी सांगतात. स्मार्टफोन ज्यांच्या घरी नाही त्यांच्या मुलांची शिकण्याची संधी हुकते आहे असे वाटते.

घरात पूर्वीपासून आपसातील वादविवाद होते. या करोनाच्या लॉकडाऊनमध्ये ते इतके वाढले की हमरीतुमरीवर आले. पोलीस चौकीत कुणीच कर्मचारी नसायचे. सर्व पोलीस  बंदोबस्तासाठी गेलेले असायचे. घरात स्त्रियांना मारहाण वाढली पण तक्रार करायला ठिकाणा नाही. बेवड्यांना दारू हवी असायची. त्यासाठी ते घरात धिंगाणा करायचे. खूप जास्त पैसे देऊन दारू प्यायचे. त्यासाठी घरात चोऱ्या, हाणामारी, वस्तू गहाण ठेवणे असे सारे चालायचे. ‘कमाई झिरो बेवड्या बनला गमाईचा हिरो’ असे घडले.

या सगळ्या संकटात एप्रिलमध्ये रेशनवर गहू, तांदूळ मोफत मिळाले. नोव्हेंबरपर्यंत सर्व रेशनकार्डवर धान्य मिळाले. ही मदत उपयोगी पडली असे सर्वजणींनी सांगितले. अनेक संस्थांनी जीवनावश्यक किराणामालांची किट्स तयार करून वाटलीत. काही जणींना दिलासा मिळाला हेही आवर्जून सांगितले. अनेक वस्त्यांमध्ये कार्यकर्ते मदत करण्यात तत्पर होते; असे जाणवले. रोज ताप मोजणे, ऑक्सिजन पातळी मोजणे हे काम ते करायचे. आजाऱ्यांना, करोनाग्रस्तांना मदत करायचे. पुणे मनपानेही मोफत उपचार, ॲम्ब्युलन्सची मदत केली. हाही मोठा दिलासा होता. उपचार मोफत मिळाले हे महत्त्वाचे ठरले.

घरेलू कामगार महिला म्हणतात, “आमची पूर्वीची कामे परत मिळायला पाहिजे. या सहा-सात महिन्यात सर्वांनाच कर्ज काढावे लागले. ते फेडण्यासाठी सरकारने आर्थिक मदत किमान दहा हजार रुपये महिना द्यावी. घरमालकाने भाडे थकले म्हणून बाहेर काढता कामा नये असा बंदोबस्त केला पाहिजे. दिवाळीचा बोनस सर्व मालकिणींनी द्यावा. सर्वच शाळांमधील शिक्षण मोफत करा. दिवाळीसाठी रेशनवर साखर, रवा, मैदा, तूप, डाळी या वस्तूंचा पुरवठा करा.

(अनेक घरेलू कामगारांना अजूनही मदतीची नितांत गरज आहे. या गरजूंना मदतीसाठी आपण मेधा थत्ते – 9422530186 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.)

मेधा थत्ते, पुणे शहर मोलकरीण संघटना 

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

[pvcp_1]

This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.